कामचुकार अधिकार्यांचा खा. डॉ. कल्याण काळे यांनी घेतला समाचार; दिशा समितीच्या बैठकीला गैरहजर अधिकारी कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस
दिशा समितीची आढावा बैठक संपन्न
जिल्ह्यातील विकासाची कामे तात्काळ पार पाडावी – खासदार डॉ.कल्याण काळे यांचे आवाहन
सर्वसामान्य जनतेची आडवणूक करणार्या आणि विविध योजनेचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवणार्या कामचुकार अधिकार्यांचा खा. डॉ. कल्याण काळे यांनी चांगलाच समाचार घेतला असून काम न करणार्या आणि बैठकीला गैरहजर राहणार्या अधिकार्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिलेत. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेतली.
यावेळी खासदार डॉ. काळे बोलत होते. बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम., अपर जिल्हाधिकारी रिता मैवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिल पठारे, यांच्यासह समिती सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी खा. डॉ. कल्याण काळे यांनी जल जीवन मिशन, महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महिला व बालविकास, कामगार विभाग, महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण, एमएसआरएलएम, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांसह विविध विभागाच्या योजनेचा आणि सध्या स्थितीत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. दरम्यान जलजीवन मिशन आणि कामगार विभागाच्या अनुषंगाने कोणताच विषय विषयपत्रिकेवर दिसून आला नाही. त्यामुळे खा. डॉ. कल्याण काळे यांनी तो विषय निदर्शनास आणून दिला. शिवाय मागील दिशा समितीच्या बैठकीतील काही विषय देखील प्रोसिडींगला घेतले नसल्याचे खा. काळे यांच्या लक्षात आले. त्यावरुन त्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी लावा ः गेल्या काही दिवसापुर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशीचा विषय पुढे आला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी लावण्याचा विषय प्रोसिडींगमध्ये घेण्यास सांगीतले होते. परंतु, चौकशीचा विषयच प्रोसिडींगमधून वगळण्यात आला. त्यामुळे खा. डॉ. कल्याण काळे यांनी संताप व्यक्त करुन पुन्हा तो विषय प्रोसिडींगला घेऊन चौकशी करण्याच्या सुचना केल्या.
एकाच कुटूंबात घरकुलाचा लाभ देणारे गटविकास अधिकारी यांची चौकशी करा
दरम्यान जालना जिल्ह्यातील काही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी नवरा, बायको, मुलगा अशा पध्दतीने एकाच घरात अनेक घरकुलाचा लाभ दिल्याचे आढळून आले, त्यावेळी अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी उदय राजपूत होते, सध्या ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यामुळे तत्कालील गटविकास अधिकार्याची चौकशी करुन अहवाल पुढील बैठकीत ठेवण्याचे निर्देश खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिले.
कामे न करता बीले उचलणार्यावर कारवाई
या बैठकीत काही तक्रारीही झाल्या. कामे न करता बीले उचलण्यात आल्याचे दिशा समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर एक समिती गठीत करुन चौकशी करुन कारवाई करण्याच्या सुचना खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिल्या.
यांच्यावर कारवाईच्या सुचना दिशा समितीच्या बैठकीसाठी अनेक अधिकार्यांनी दांडी मारली. त्यामध्ये सर्वच तहसिलदार आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांचा समावेश होता. सदरील विभागाच्या अधिकार्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या सुचना खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिल्या. त्यावर जालना तहसिलदार वगळता इतर सर्व तहसिलदार आणि जलसंपदा अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बाजवली जाणार आहे.
प्रस्ताव नाकारणार्या आणि प्रलंबीत ठेवणार्याची चौकशी जनतेच्या कामावर विशेष लक्ष देत खा. डॉ. कल्याण काळे यांनी विविध विभागाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रलंबीत प्रस्तावचा आणि नाकारलेल्या प्रस्तावाचा आढावा घेतला. त्यात सन 2022 ते 2024 पर्यंत जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात एकही विहीर का मंजुर करण्यात आली नाही. तसेच अंबड आणि घनसावंगीतील काही योजनेचे प्रस्ताव का नाकारण्यात आले असा सवाल खा. डॉ. कल्याण काळे यांनी उपस्थित केला. त्यावर अधिकार्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. कोणतेही प्रस्ताव विनाकारण नाकारु नका, जनतेला त्रास देऊ नका, योजनेचा सर्वांना लाभ द्या असे निर्देश खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिलेत.
काम न करणार्या एजन्सीला काळ्या यादीत टाका
या बैठकीत जलजीवन मिशन आणि महावितरण विभागाचे कामे रखडल्याचे दिशा समितीच्या लक्षात आले. त्यामुळे कामे न करता बीलं उचलणार्या आणि कामं प्रलंबीत ठेवणार्या एजन्सीवर कारवाई करा, दंडात्मक कारवाईवर देखील काम होत नसेल तर त्यांना काळ्या यादीत टाका असे खा. डॉ. कल्याण काळे आणि आमदार नारायण कुचे यांनी संबंधिक विभागाला सुचविले. दरम्यान लोकहिताची विकास कामे करतांना प्रशासकीय अधिकार्यांनी लोकप्रतिनिधींच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामासह इतरही कामे तातडीने सुरु करुन वेळेत पुर्ण करावीत. ग्रामीण रस्ते हे गावातील गावकरी व शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे रस्ते असून त्यांच्यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ.काळे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील कामामध्ये बराच कालावधी उलटल्यानंतरही कोणतीच प्रगती झाली नसून, या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल खासदार डॉ.काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या योजनेतंर्गत काही गावात झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरातील व ग्रामीण भागातील दिल्या जाणार्या अनुदानाच्या फरकाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्वयं सहायता गट स्थापन झालेल्या बचतगटांना बँकांकडून निधी मिळण्यास येणार्या अडचणी दूर कराव्यात. अशी सुचनाही खासदार डॉ.काळे यांनी केली. बैठकीत समितीचे अध्यक्ष डॉ.काळे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना,राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मध्यान्ह भोजन योजना, संजय गांधी निराधार योजना, डिजीटल भारत, सर्व शिक्षा अभियान, जल जीवन मिशन, उमेद, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, महावितरण, स्वामित्व हक्क, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध लाभाच्या योजना आदी योजनांचाही यावेळी आढावा घेतला. जालना महानगर पालिकेच्या हद्दीतील प्रॉपर्टी कार्डच्या कामासह इतर कामांबाबतही दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ काळे यांनी विविध सुचना केल्या. केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिशा समिती काम करत असते. यात एकूण 22 विषय समाविष्ट आहेत. केंद्राच्या विविध योजना तालुकास्तरावर प्रलंबित न ठेवणे तसेच विकास कामात दिरंगाई झाल्यास तपासणी करणे आदी कामे दिशा समितीकडून करण्यात येत असते. तसेच जिल्ह्यातील बेघर असणार्या गरजु लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणार्या विविध योजनेतील कामे, लाभार्थ्यांची संख्या जाणून घेत उपस्थित लोकप्रतिनिधी व सदस्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी बैठकीला संबंधित उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. योजनेंतर्गंत मंजूर असलेली लोकहिताची विकास कामे वेळेत पार पाडावीत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिल्या.