राजूर आठवडी बाजारातून मोटारसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ₹35 हजारांची मोटारसायकल जप्त

हसनाबाद : राजूर येथील आठवडी बाजारातून मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा हसनाबाद पोलिसांनी पर्दाफाश करत एका आरोपीस अटक केली असून, चोरीस गेलेली सुमारे ₹35 हजार किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 19 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी दशरथ सेनाजी वाळकुंडे (वय 34, रा. चिखली, ता. बदनापूर, जि. जालना) हे आठवडी बाजारासाठी राजूर येथे आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल (क्र. MH-21 BC-5321) बाजार परिसरात उभी करून खरेदीस गेले असता, परत आल्यानंतर वाहन आढळून आले नाही. यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र मोटारसायकल मिळाली नाही. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 105/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेला आरोपी परमेश्वर प्रभाकर वरपे (रा. चणेगाव) याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटकेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस ठाणे हसनाबाद येथील प्रभारी अधिकारी योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले नरहरी खार्डे ,दुरगेश राठोड,राहुल भगिले,प्रकाश बोरडे,अविनाश मते,नीलेश खरात,धनंजय जगडले,व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
👉 या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.